जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता साळवे व लिपिक आकाश गोसावी यांची उचलबांगडी

0
3

पिंपरी दि. १८ – महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात दोन महिन्यात १८ लाख ६६ हजार ३८८ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता श्रीरंग साळवे व लिपिक आकाश प्रदीप गोसावी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी करण्यात आली. तर लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.

जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा होणाऱ्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाला. ०१ मार्च २०२४ ते ३० एप्रिल २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत ९ लाख ७६ हजारांचा ६९१ रुपयांची रक्कम जिजामाता रुग्णालय व महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हडप केली. असा आरोप काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी केला होता.

काय आहे प्रकरण
जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेच्या भरणार रजिस्टरमध्ये अफरातफर झाली. रोजच्या रोज जमा होणारी भरणा रक्कम बँकेत न भरता तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर अधिकाऱ्यांनी केला. रुग्णांकडून जमा होणारी रक्कम रोजच्या रोज न भरता नंतरच्या तारखेला भरण्यात आली. १ मार्च ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एकूण १८ लाख ६६ हजार ३८८ रुपये ३० दिवसांनी भरल्याचे लेखा परीक्षणात सिद्ध झाले आहे.

दरम्यान, लेखापरीक्षणात डॉ. सुनिता साळवे व लिपिक आकाश गोसावी यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळून आले. डॉ. साळवे यांच्यावर या आधीही मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली आहे. आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

लेखा परीक्षणात जिजामाता रूग्णालयात झालेला भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. मात्र, यामध्ये फक्त दोघांची बदली करण्यात आली आहे. त्यामधील सहभागी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर,वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन होतवानी, वैद्यकीय अधिकारी , डॉ. विकल्प भोई, लिपिक आकाश गोसावी या सर्वांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमवून जिजामाता हॉस्पिटल व इतर सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी केली.