जिजामाता रुग्णालयातील १८ लाख अपहार प्रकरणात चौकशी सुरू

0
38

पिंपरी, दि.11 (पीसीबी) : पिंपरीतील महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील गैरव्यवहारप्रकरणी एका लिपिकाची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या लिपिकाने १८ लाख ६६ हजार रुपये महापालिका कोषागरात विलंबाने भरल्याचे उघडकीस आले होते.

आकाश गोसावी असे खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी जमा झालेले १८ लाख ६६ हजार रुपये महापालिका कोषागरात विलंबाने जमा केल्याचे आणि त्यामध्ये आर्थिक अपहार झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाची समिती नेमून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत; तसेच विभागप्रमुखांच्या शिफारशीमध्ये लिपिक गोसावी यांच्यावर हलगर्जीपणाचा, तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे.

आयुक्त शेखर सिंह यांनी गोसावी यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला. त्यांंच्यासह ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेले शिपाई अनिल नाईकवाडे यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.