जिजामाता, थेरगाव रूग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल उभारणार

0
278

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवीन जिजामाता रूग्णालय आणि नवीन थेरगाव रूग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल उभारण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रीया संकुलांसाठी 3 कोटी 12 लाख रूपये खर्च होणार आहे.महापालिकेच्या वतीने मार्च 2020 मध्ये नवीन जिजामाता रूग्णालय आणि जून 2021 मध्ये नवीन थेरगाव रूग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. जिजामाता रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल उभारण्यात येणार आहेत. तसेच थेरगाव रूग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल बांधण्यात येणार आहेत. त्याकरिता आवश्यक स्थापत्य विषयक बांधकाम पूर्ण करण्यात आली आहेत. तथापि, इमारत बांधण्याच्या मुळ निविदेत मोड्युलर शस्त्रक्रीया संकुल तयार करण्याच्या कामाचा समावेश नसल्यामुळे या शस्त्रक्रीया संकुलांची उर्वरीत कामे अपूर्ण होती. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी 30 मे 2022 रोजीच्या बैठकीत सुचना दिल्या होत्या.

तसेच याबाबत दोन्ही रूग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनीही पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही कामांचा अंदाजपत्रकात नव्याने समावेश करून त्याकरिता आवश्यक तरतुद वर्ग करून कामाची निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन जिजामाता रूग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल तयार करणे व इतर आवश्यक कामे करण्यासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 1 कोटी 18 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एस. बी. काळे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 23.91 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 89 लाख 57 हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 1 हजार 363 रूपये आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 14 हजार 445 रूपये असे एकूण 89 लाख 72 हजार रूपये खर्च होणार आहेत. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

नवीन थेरगाव रूग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल तयार करण्यासाठी 2 कोटी 97 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये ए. आर. नायडू या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 25.25 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 2 कोटी 22 लाख 5 हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 4 हजार 678 रूपये आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 29 हजार 165 रूपये असे एकूण 2 कोटी 22 लाख 39 हजार रूपये खर्च होणार आहेत. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.