सातारा, दि.03 (पीसीबी) : पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीनेच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना विंग ता. कराड जि. सातारा येथून उघडकीस आली आहे. मयुरी मयुर कणसे (वय-२७ वर्षे) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती मयुर यशवंत कणसे (वय-३० वर्षे) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील विंग येथील मयुर कणसे याचे मयुरी यांच्याशी २०१८ मध्ये लग्न झाले. त्यानंतर एकाच वर्षात त्याच्यात वाद सुरू झाला. घरातील लोकांशी पटत नसल्याची मयुरीची तक्रार होती. त्यामुळे मयुरीचे नेहमीच घरातील लोकांसोबत खटके उडत होते. या सततच्या वादामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरी गेली होती.
त्यानंतर चार महिन्यापासून मयुरी व मयुर त्यांच्या मुलासह विंग हॉटेल परिसरातील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला गेले होते. त्याच्यात सतत वाद व्हायचे. तसा वाद ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीही सुरू होता. त्यावेळी रागाच्या भरात मयुरने पत्नीला मारहाण केली. त्या रागातच त्याने पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मयुरने त्याचा चुलत भाऊ विशाल कणसे याला मयुरीचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मयुरचा फोन आल्याने विशाल त्वरीत तेथे पोहोचला. त्याच्यासोबत मयुरचा भाऊ महेश कणसेही होता. त्या दोघांनाही मयुरीला आवाज देवून उठवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयुरीला कारमधून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयुरीला डॉक्टरांनी तपासलेअसता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी पती मयुर यास अटक केली आहे.