‘जाने कहाँ गये वो दिन’ कार्यक्रमात ज्येष्ठ रमले भूतकाळात

0
1

दि.३०(पीसीबी)- आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त ठाकरे मैदान, यमुनानगर, निगडी येथे ‘जाने कहाँ गये वो दिन!’ या जुन्या हिंदी – मराठी गाण्यांचा सुरेल कार्यक्रमात आपले वय, व्याधी अन् विवंचना विसरून ज्येष्ठ नागरिक भूतकाळात मनसोक्त रमले. सुनील राणे यांनी या सांगीतिक कार्यक्रमाचे बहारदार निवेदन करीत उपस्थितांना खिळवून ठेवले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक उत्तम केंदळे, बापू घोलप, नगरसेविका सुलभा उबाळे, अर्चना कारंडे तसेच आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष भानुदास कदम, सचिव कचरू जगदाळे, सहसचिव माणिकराव माने, खजिनदार श्रीकृष्ण पुरोहित, सहखजिनदार बाळकृष्ण ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वर्धापनदिनानिमित्त जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या संघातील सभासदांचे मान्यवरांकडून अभीष्टचिंतन करण्यात आले; तसेच संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नवीन वर्षानिमित्त सर्व उपस्थितांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कचरू जगदाळे, बाळकृष्ण ठोंबरे, श्रीकृष्ण पुरोहित, दगडू चव्हाण, ज्ञानेश्वर भूतकर यांनी संयोजनात सहकार्य केले. संघाचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माणिकराव माने यांनी अहवालवाचन केले तसेच आभार मानले.