जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0
522

चाकण, दि. १७ (पीसीबी) – जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम (ऍट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ मे २०२२ रोजी दुपारी चांदणी चौक खराबवाडी येथे घडली.

याप्रकरणी शुभम बाबाराव मनवर (वय २५, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १५) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय खोपडे (रा. चांदणी चौक, खराबवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय हा फिर्यादी यांना वारंवार शिवीगाळ व धमकी देत असल्याने ते राहत असलेली खोली खाली करून त्यांनी दुस-या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुभम यांनी नाणेकरवाडी येथे एक मित्र राहत असलेल्या ठिकाणी खोली पाहिली. तिथे राहण्यासाठी बॅग घेऊन जात असताना आरोपीने शुभम यांना रस्त्यात अडवले. ‘तू माझी पोलीस स्टेशनला तक्रार का दिली. ती तक्रार मागे घे’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.