जातीपातीत लढणे ही शिवरायांच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही – अविनाश धर्माधिकारी

0
43
  • युवकांनी राष्ट्रहितासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन

चिंचवड दि.१६ (पीसीबी) –
भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकसित भारत -विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी सजग राहून १००% मतदान करण्याची गरज आहे. फक्त संविधान हातात दाखवून प्रत्यक्षात मात्र भारताबाहेर देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींसारख्या ढोंगी नेत्याला संविधान शिकवण्याची खरी गरज असल्याचे परखड मत माजी सनदी अधिकारी , शिक्षण तज्ज्ञ अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.
ते इंड जिनियस (IND Genius) तर्फे युवकांसाठी आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ सभागृहात बोलत होते. व्यासपीठावर श्री बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रा.गंगाधर शिरोदे सर, डीन प्रा.बिजू पिल्लई सर प्रामुख्याने उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, समान नागरी कायदा – देशभक्तीची लिटमस टेस्ट आहे. समान नागरी कायद्यामुळे संविधान व राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळणार आहे. समाजवादाच्या नावाखाली हिंदू विरोधी ढोंगी बडबड आताचे काँग्रेस नेते करत आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कलम ३७० ला तीव्र विरोध केला होता या कलामाचे ड्राफ्टींग देखील त्यांनी केले नाही, ज्या दिवशी नेहरूंच्या नेतृत्वात हे सादर झाले त्या दिवशी विरोध म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुपस्थित राहिले. मोदी सरकारने हे कलम परास्त केले आहे युवकांनी या अनेक गोष्टी अभ्यासून संविधान अभ्यासले पाहिजे. काही नेते फक्त ढोंग करून संविधान दाखवत फिरतात पण संवैधानिक गोष्टी करत नाहीत ही शोकांतिका असल्याचे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधी देशाबाहेर जाऊन संविधान तत्व विरोधी बोलून भारतात संविधान दाखवून रक्षणाचे ढोंग करतात हे तुम्ही युवकांनी लक्षात घ्यावे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून युवा पिढी ही या राज्याला पर्यायाने देशाला बळकट करणारे नेतृत्व आहे, येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीत देशहित ओळखून सुट्टी साजरी न करता हिंदुत्वासाठी, संविधान रक्षणासाठी, ढोंगी नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन केले कारण हिंदुत्व टिकले तरच हा देश व संविधान रक्षण होऊ शकणार आहे आपली हिंदू संस्कृती ही चंगळवादी भोगवादी नसून त्याग शिकवणारी आहे विकसित भारतात दारिद्र्य, विषमता नको.
अनेक उदाहणाद्वारे युवकांना करियर बाबत मार्गदर्शन केले. युवकांनी सजग राहून विकसित भारतात एक शक्ती म्हणून उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक यांनी, सूत्रसंचालन अमेय देशपांडे तर आभार सिध्देश्वर लाड यांनी मानले.