जातीच्या आधारावर भेदभाव करणे सावरकरांना मान्य नव्हते

0
209

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत डॉ. गुरू प्रकाश पासवान यांचे प्रतिपादन

निगडी, दि. 6 – जातीच्या आधारावर भेदभाव करण्याची प्रथा अमेरिकेत सुर झाली आहे. सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात सामाजिक एकतेचा सामान सूर आहे. जातीच्या आधारावर भेदभाव करणे सावरकरांना मान्य नव्हते. भारतात सातत्याने सामाजिक समतेला प्राधान्य दिले. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला बदनाम केले असल्याचे मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. गुरू प्रकाश पासवान यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे पाचवे आणि अंतिम पुष्प डॉ. गुरू प्रकाश पासवान यांनी गुंफले. यावेळी ते ‘सामाजिक न्यायाची भारतीय संकल्पना’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे अशितोष खांडकर, तसेच विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. गुरू प्रकाश पासवान म्हणाले, “स्वातंत्र्य लढ्याचे श्रेय एकाच परिवाराला, एकाच संघटनेला दिले जाते. हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सामाजिक समतेच्या अनेक घटनांना जाणीवपूर्वक लपवले गेले. विशिष्ट राजकीय पक्षांकडून सामाजिक समतेची मोडतोड केली जात आहे. महर्षी वाल्मिकी यांनी रामायण, महर्षी वेद व्यास यांनी महाभारत लिहिले. दोन्ही ग्रंथ संपूर्ण भारतात मार्गदर्शक ठरले. या दोन्ही ग्रंथांचे रचयीता कोणत्या समाजातील होते, याचाही विचार व्हायला हवा.

आपल्या देशातील संत आणि विचारवंतांनी सांगितलेले ज्ञान कायम नाकारले गेले. याच उलट विदेशी लोकांनी सांगितलेले ज्ञान कुठलाही विचार न करता आपण घेत आहोत. एक समाज, एक राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना कायम बाजूला सारले गेले. सत्य आणि तर्काच्या आधारावर बोलण्याची गरज आहे. विवाद नको संवाद हवा, अशी प्रत्येकाने हाक द्यावी, असेही डॉ. पासवान म्हणाले.

सुरुवातीपासून भारतात एकात्मता होती. मात्र काही लोकांनी धर्म आणि जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असला तरी चालेल पण त्याच्यासाठी देश सर्वप्रथम असायला हवा. अशा विचारांचे सगळे लोक एकाच समाजाचे आहेत असे सांगत डॉ. गुरू प्रकाश पासवान यांनी बाबू जगजीवनराम, जोगेंद्रनाथ मंडल, परमेश्वर चौपाल, झलकारी बाई, गुलाम अली खटाणा, कानकदास, राजा भिलदेव, बाळासाहेब देवरस, संत चोखामेळा यांचे सामाजिक समतेचे दाखले दिले.

मंडळाचे सचिव सागर पाटील यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले. राजेंद्र देशपांडे यांनी परिचय करून दिला. पाच दिवसांच्या या व्याख्यानमालेचा शुक्रवारी (दि. 5) समारोप झाला. पिंपरी चिंचवड मधील सर्व रसिक श्रोत्यांचे व्याख्यानमालाप्रमुख शिवानंद चौगुले व सहप्रमुख विकास देशपांडे यांनी आभार मानले.