दि . १४ ( पीसीबी ) – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे एका टोळक्याने हल्ला केला. यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाईफेक आणि वंगणाचे तेल ओतण्यात आले. यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगण तेलाच्या काळ्या रंगाने माखून गेला होता. प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशा रितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे. त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो! मला फक्त एक प्रश्न आहे, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, तो प्रशांत कोरटकर शिवयारांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवधर्म संघटनेचे आणि भाजप पदाधिकारी इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला होता. बी एन एस. कलम 115(2), 189(2),191(2),190, 324(4) ही गुन्हेगारी कलमं संबंधितांवर लावण्यात आली आहेत. जमाव जमवून मारहाण करणे, गाडीची काच फोडणे आणि शाई फेक, असा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तर उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. दिपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर आणि कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन भाष्य केले. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.