जागा 386 अन् अर्ज आलेत 85 हजार 771.

0
295

पिंपरी,दि.१५ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 जागांसाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या 1 लाख 30 हजार 470 अर्जांपैकी छाननीत 85 हजार 771 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. या अर्जांच्या परीक्षा शुल्कातून महापालिका कोषागरात सुमारे 7 कोटी रुपये जमा झाले आहेत. तब्बल 2 हजार 174 हजार माजी सैनिकांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. तर, अर्ज पात्र होवूनही 1 हजार 69 जणांनी परीक्षा शुल्क भरले नाही. बिंदु नामावली तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू केली. महापालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजारहून अधिक जागा रिक्त आहेत.

या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती करण्याकरिता ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 जागांसाठी 13 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, विभागीय अग्निशमन अधिकारी – 1, उद्यान अधिक्षक (वृक्ष) – 1, सहाय्यक उद्यान अधिक्षक -2, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8, कोर्ट लिपिक – 2, अॅनिमल किपर -2 आणि समाजसेवकाच्या 3 अशा 386 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. ऑनलाईन प्राप्त झालेल्या 1 लाख 30 हजार 470 अर्जांपैकी छाननीत 85 हजार 771 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे 386 जागांसाठी 85 हजार 771 परीक्षार्थी असणार आहेत. तब्बल 2 हजार 174 हजार माजी सैनिकांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.

लिपिकाच्या 213 जागांसाठी तब्बल 33 हजार 897 अर्ज

यात लिपिकाच्या 213 जागांसाठी सर्वाधिक म्हणजेच 33 हजार 897, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)साठी 30 हजार 908, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 12 हजार 261, कनिष्ठ अभियंता (विद्युत)साठी 4 हजार 382, आरोग्य निरीक्षक 1 हजार 939, समासेवक 1 हजार 433, हॉट्रीकल्चर सुपरवायझर 223, उद्यान निरीक्षक 153, विधी अधिकारी 129, उद्यान अधिक्षक 122 असे 386 जागांसाठी 85 हजार 771 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जातून महापालिका कोषागरात 6 कोटी 99 लाख 17 हजार 600 रुपये जमा झाले आहेत. आता परीक्षा कधी होणार याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, ” विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे बिंदु नामावली तपासण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. आरक्षण तपासणीत काही बदल होवू शकतो. दोन संवर्गाची तपासणी पूर्ण झाली आहे. तर, दोन संवर्गाच्या आरक्षणाच्या तपासणीचे काम सुरु आहे. संपूर्ण संवर्गातील तपासणी झाल्यानंतर आरक्षणात काही बदल असल्यास तो प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा मार्ग मोकळा होईल”.