चिखली, दि. २४ (पीसीबी) – जागा विकासाच्या कामासाठी विलंब लागत असल्याने जागेच्या मूळ मालकांनी विकासकाला धमकी दिली. तसेच विकसनाचे काम करण्यास प्रतिबंध करत कामगारांना मारहाण केली. ही घटना 17 मे ते 22 मे या कालावधीत चिखली येथे घडली.
प्रशांत जालिंदर हिंगे (वय 33, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिरुद्ध राजेंद्र जाधव, प्रणव वासुदेव जाधव, मयूर संजय जाधव, गणेश चांगदेव जाधव, अनिकेत अरुण जाधव, कुमार राजेंद्र जाधव, एक महिला (सर्व रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीने आरोपींकडून सन 2013 मध्ये त्यांची जमीन विकसन करण्यासाठी घेतली. विकसन करण्यासाठी लागणारी परवानगी आणि मंजुरीसाठी वेळ लागत असल्याने विकसनाच्या कामास विलंब झाला. त्यामुळे कंपनीकडून जागेचे मालक आणि त्यांच्या वारसदारांना वेळोवेळी विलंब दंडाचा धनादेश देण्यात आला होता. पुढील कालावधीत देखील विलंब दंडाची रक्कम देण्यास फिर्यादी यांच्या कंपनीची संमती होती. असे असताना आरोपींनी विकसन सुरू असलेल्या बांधकाम साईटमध्ये अतिरिक्त क्षेत्राची मागणी केली. ही मागणी व्यवहारिक नसल्याने कंपनीकडून ती मागणी अमान्य करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस धमकी दिली. तसेच कामगारांना शिवीगाळ करून काम बंद पाडले. बांधकाम साइटवर आरोपींनी बोर्ड लावला. फिर्यादी यांनी तो बोर्ड काढला असता आरोपींनी त्यावरून शिवीगाळ व धमकी देत फिर्यादी यांच्या कामगाराला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












































