जागतिक मराठी संमेलन पाच ते आठ जानेवारीला पिंपरी चिंचवड शहरात

0
302

पुणे, दि. २३ (पीसीबी) – जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे पाच ते आठ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ या अठराव्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी सचिन ईटकर, सुनील महाजन, प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. ‘पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात हे संमेलन रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनाही ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र, तेथील संसदेचे अधिवेशन असल्याने हा पुरस्कार त्यांना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रदान करण्यात येणार आहे. वसई येथील विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे’, असे फुटाणे यांनी सांगितले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे संमेलनाध्यक्ष असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनातील विविध कार्यक्रमांना अखिल भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात चित्रपट, नाटक, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांतील मान्यवरांशी संवादाचे कार्यक्रम होणार आहेत, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.