जागतिक उद्योजकता परिषदेत डॉ. पी. डी. पाटील यांचा विशेष सन्मान

0
2

पुणे, दि. १९ : येथे नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना लिव्हींग लिजंड ऑनर ने सन्मानाने गौरवण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व परिषदेचे मुख्य संयोजक सचिन ईटकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती.

डॉ. डी. वाय. पाटील संस्थेने पिंपरी-चिंचवडमध्ये १९८४ साली पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय सुरू केले. त्याची जबाबदारी डॉ. पी. डी. पाटील यांच्यावर होती. पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरी म्हणून उभारणीच्या काळात डॉ. पाटील यांच्या शिक्षणसंस्थांनी उच्चशिक्षित मनुषबळाचा पुरवठा केला त्यामुळे या शहराचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला. त्याचे श्रेय गेली ४० वर्षे अविरत कष्ट करणाऱ्या डॉ. पाटील यांना अधिक आहे, अशा शब्दांत संयोजकांनी डॉ. पाटील यांचा गौरव केला.

पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, गर्जे मराठी ग्लोबल आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (MEDC) यांनी संयुक्तपणे पुण्यात आयोजित केलेली दोन दिवसांची ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ कमालीची यशस्वी ठरली. जगभरातून आलेल्या तसेच देशातील १३०हून अधिक श्रेष्ठतम तज्ज्ञ पॅनलिस्ट वक्त्यांनी उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक उद्योजक-व्यावसायिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.