जल्लोष 2024 युवक महोत्सव स्पर्धेत नाव नोंदणीचे आवाहन

0
88

चिंचवड, दि. 15 (पीसीबी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष 2024-२५ जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात दि.२३ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून केले आहे. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहर, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील, पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 27 प्रकारांमध्ये विविध स्पर्धेत भाग घेऊन सहभागी होता येईल.

त्यात प्रामुख्याने संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन, टाळ वाद्य, स्वर वाद्य, सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य, समूहगान, लोकसंगीत वाद्य वृंद यांच्या समावेश असेल, तसेच नृत्य प्रकारात लोक आदिवासी व शास्त्रीय भारतीय नृत्य रंगमंचीय कला विभागात एकांकिका प्रहसन, मूकनाट्य, नकला, ललित कला प्रकारात स्थळ चित्र, चित्रकला, भितीचित्र, माती कला, मेहंदी, रांगोळी इत्यादी तर वाड्मय प्रकारात मग प्रश्नमंजुषा, वकृत्व आणि विवाद स्पर्धा यांच्या समावेश आहे. एकूण प्रमुख पाच गटामधून २० कला प्रकारांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक कला प्रकारातून प्रथम, द्वितीय, तृतीय, वैयक्तिक व सांघिक विजेत्या क्रमांकाची निवड केली जाईल. विजेत्यांना प्रमाणपत्र व पदके बहाल केली जातील. त्याचबरोबर उत्तम सांघिक कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालयाच्या चषक व उत्कृष्ट संघनायकाच्या चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्यास उत्कृष्ट विद्यार्थी जल्लोष पुरस्कार चषक देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना तसेच, विजेत्यांना पुढे राज्यस्तरीय, इंद्रधनुष्य, पश्चिम विभागीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहभागी होण्याची संधी आहे. तरी या महोत्सवामध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त वरिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, सांस्कृतिक समन्वयक रोहित अकोलकर व विद्यार्थी विकास अधिकारी ज्योती इंगळे यांनी केले आहे.

स्पर्धेची अधिक माहिती व सहभाग घेण्यासाठी मोबाईल क्रमांक 9763231738 दि. २० पूर्वी संपर्क करावा असे आवाहान केले आहे.