एरलांगन,दि.१०(पीसीबी) – जर्मनीतील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशाच्या गजरात आणि शेकडो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.
मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी तर्फे आयोजित केलेल्या या मिरवणुकीत अठरा जणांच्या ढोल, ताशा व झांज पथका सोबत ३८ महिला व पुरुष गटाने लेझीम नृत्य सादर केलं तर छोट्या मुलांनी थोर भारतीय महापुरुषांच्या वेशभूषेत देखावे सादर करत उपस्थितांना मिनी इंडिया चे दर्शन घडवलं.
विशेष म्हणजे विसर्जनचा हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील सरकारी कार्यालयच्याच्या समोर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने प्रथमच जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे आपला भगवाही फडकला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मन स्थित सर्व भारतीयांनी मनापासून सहकार्य केले आणि या सहकार्यास जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला. हे घडवून आणल्याबद्दल मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे, तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांचे खूप कौतुक आहे.