जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतात

0
261

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले. “जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत,” असा आरोप वडेट्टीवारांनी केला. ते शुक्रवारी (१० नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला १० टक्के ईडब्ल्यूस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे. परंतू मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे.”

“सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. त्यांनी जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मराठा समाज ओबीसींच्या ३७२ जातींमध्ये येऊन फार फायदा होणार नाही. ईडब्ल्यूस आरक्षणात फार जाती नाहीत,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणापेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अधिक फायदा होईल असं सांगताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतीचा जिथं संदर्भ येतो तेथे मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशास्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून हित काय याचा विचार करावा.”
“या प्रश्नावर मी मराठा नेत्यांच्या भूमिकेवर बोलण्याची गरज नाही. त्यांनी मराठा तरुणांना कशात हीत आहे, काय चांगलं आहे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.