जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध, पाणी का पाणी करु

0
238

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला कुणबी प्रमापत्रांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर कोर्टात आव्हान देण्याची तयारी ओबीसी समाजाकडून सुरु आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची औकात काढली आहे. तसेच मनोज जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध, पाणी का पाणी करु…असे थेट आव्हान दिले आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके
ओबीसी नेते कोर्टात गेले तर आपण मंडल आयोगाला चॅलेंज करु, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, एकीकडे ओबीसीतून आरक्षण मागायचे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करायचे, अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील तुझी औकात काय आहे? डुप्लिकेटपणा करून ओबीसीत तुम्ही घुसखोरी केली आहे. मनोज जरांगे कोर्टात आवश्यक भेटू, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

ओबीसीचा हक्क हिरावला
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना कोर्टात नक्की भेटू, असे आव्हान दिले. तसेच ओबीसींचा हक्क हिरावल्याचे त्यांनी म्हटले आहे. जरांगे तुला तुझ्या लेकरा बाळांचे पडलेले नाही तर तुला गोरगरीब ओबीसीचा हक्क हिरावून घ्यायचा आहे. सरकारवर दबाब आणून आरक्षण मिळाले. परंतु ते कोर्टात टिकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदावर राहून पदाचा गैरवापर केला आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. त्यामुळे आता कोर्टात नक्की भेटू, असे त्यांनी स्पष्ट केले.