जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची पुन्हा चौकशी

0
249

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता सर्वांना 4 जूनरोजी लागणाऱ्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. अशात निवडणूक संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांशी संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. राज्याच्या ⁠लाचलुचपत विभागाकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जरंडेश्वर कारखान्याची चौकशी ही अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात ही चौकशी सुरू आहे .

यापूर्वी ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं. आता एसीबीकडून त्याची परत चौकशी केली जातेय.यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार शालिनीताई पाटील या जरंडेश्वर साखर कारखाना त्यावेळी चालवत होत्या. त्यावेळी कर्जात बुडालेल्या या कारखान्याला वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र, यात त्या अपयशी झाल्या. नंतर हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गुरु कमोडिटी या प्रायवेट लिमिटेड कंपनीने खरेदी केला.अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याची माहिती आहे.

अशात शालिनीताई पाटील यांनी जरंजेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात देखील गेलं. हायकोर्टाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ईडीकडून या सर्व प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली.