मुंबई, दि.५ (पीसीबी) : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्यावर ताब्यात घेतल्याचा पोलिसांचा दावा जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी फेटाळला असून निराधार असल्याचे म्हटले आहे. जयदीप आपटेने आत्मसमर्पण केले आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटने संदर्भात असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर मुख्य आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे . आपटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी लपून छपून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आलंय. जयदीप आपटेला पकडण्यासाठी सात पथकं नेमण्यात आली होती. याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला ताब्यात घेतलं, असे पोलिसांचे म्हणणे आहे.तसेच फरार झाल्यानंतर आरोपी जयदीप आपटे हा वकिलांच्या संपर्कात होता.
जयदीप आपटेचे वकील काय म्हणाले?
अटकपूर्व जामिनाला न जाता स्वतःहून सरेंडर होणे पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजले. त्यामुळे त्याच हिशोबाने कुटुंबांशी चर्चा करून आज सरेंडर करायचा निर्णय कालच निर्णय झाला होता. बाजारपेठ पोलिसांकडे येईल स्वतःला सरेंडर करेल पुढील न्याय प्रक्रिया होईल असे आजच ठरले होते त्यानुसार हे घडले आहे. जी चुकीची स्टोरी सांगितली जाते तो अंधारामध्ये लपत कुटुंबाला भेटण्यासाठी ते सर्व साफ खोटे आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणे त्याच्यावर झालेले आरोप हे कसे निराधार आहेत हे सांगण्यासाठी तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरे जाणार आहे.
सरेंडर कधी आणि कसे करायचे हे आधीच ठरले होते, वकिलांचा दावा
मालवणला गेल्यानंतर कोर्टात हजार केल्यानंतर आम्ही हजर होऊन युक्तिवाद जो करायचा आहे तो केला जाईल. जयदीप आपटेला हजर करण्यासाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गलिच्छ राजकारण झाले आहे आणि त्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. त्यामुळे आणखी काही फाटे फुटू नयेत सर्व शांततेने व्हावे यामागे कुठली लपाछपी करायची नव्हती. शांततेने निर्णय घेऊन त्याला सरेंडर करणे हाच आमच्या पुढे पर्याय होता, असे वकील म्हणाले.