सांगली, दि. २२ (पीसीबी) – जयंत पाटील यांच्या घरावर काही दिवसात भाजपचा झेंडा लागणार असा दावा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. काही दिवसात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विसर्जन होईल असा दावा पडळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे 90 टक्के लोक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असंही पडळकर म्हणालेत.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा झेंडा राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती लागला आहे. तुम्हाला विश्वासाने सांगतो हा भाजपचा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल. त्यातले 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील की आता आपल्याला भाजपमद्धे जावं लागेल आणि मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल. तर बहुमताने लोक भाजपमद्धे येतील असंही पडळकर बोलताना म्हणालेत.
त्यावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना मोठा पक्ष होता. त्यावर दबाव आणून राजकारण करून पक्ष फोडला. आता त्यांच टार्गेट राष्ट्रवादी असू शकतो. राष्ट्रवादी फोडणं सोपं नाही. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण चालत असतो. कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहोत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. त्यांना लोकशाही माहीत नाही पण, दडपशाही माहिती आहे असंही रोहित पवार म्हणालेत.