दि.१३(पीसीबी)-जमीन विक्रीच्या बहाण्याने ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना धानोरे (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय विश्वनाथ रोडके (धानोरे, ता. खेड), मंदाबाई उर्फ मंदा गौतम गरुड (५७, धानोरे) व सोनाबाई शशिकांत सुमुखराव (४५, कळस, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निलेश भगवान चोडके (४०, बोडकेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून धनादेशाद्वारे सात लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याबदल्यात फिर्यादी यांना जमीन देण्याचे आश्वासन दिले; मात्र ती जमीन दुसऱ्यालाच विकली. तसेच फिर्यादी यांचे पैसेही परत केले नाहीत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.











































