जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक

0
99

शिरगाव, दि. 24 (पीसीबी) : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात एका व्यक्तीची लाखोंची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 30 मे 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील चांदखेड परंदवडी सोमाटणे येथे घडला.

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेंद्र निवृत्ती निकाळजे (वय 54, रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना चांदखेड येथील गट नं. 326 मध्ये 2 हेक्टर 9.10 आर क्षेत्र जमीनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता टाळाटाळ केली. या व्यवहारा दरम्यान वारसदारांबाबत खोटे प्रतिज्ञापत्र देवून फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच शेअर मार्केट मध्ये अधिक नफा मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्र्वास संपादन करून आरटीजीएस व चेकद्वारे फिर्यादीकडून 40 लाख रुपये तसेच जमीनीच्या खरेदी कामाचे विसार पावती दरम्यान पाच लाख रुपये असे एकूण 45 लाख रुपये घेतले.

शेअर मार्केट मध्ये गंतविलेल्या पैशाच्या बदल्यात 99 लाख रुपयांच्या चेकवर फसवणूक करण्याच्या उद्देशाने अर्धवट सही करून फिर्यादी यांची फसवणूक केली. सोमाटणे येथील तलाठी कार्यालयात आरोपीने हरकत अर्ज दाखल केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी यास, तुम्ही हरकत का घेतली अशी विचारणा केली. त्यानुसार ते फिर्यादी यांना म्हणाले की, तू मला अधिकचे 50 लाख रुपये दे नाही तर मी किंवा माझ्या भावंडातील लोकांना सांगून तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुला अडकवेन, तु माझ्या नादी लागलास तर तुझी सुपारी देऊन तुझा काटा काढील. अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.