जमीनीचे खोटे व बोगस नोटरी दस्त करुन बेकायदेशीर विक्री, दिघी गावठाणातील प्रकार

0
367

बेकायदेशीरपणे जमिनीवर अतिक्रमण करत कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – वडिलोपार्जित जमिनीवर नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे ताबा मारला. त्या जमिनीची विक्री करून त्यावर टपऱ्या व व्यवसाय सुरु केला. न्यायालयातून आणलेल्या कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचा हक्क प्राप्त झाल्याचे भासवून जमिनीची विक्री करत फसवणूक केली आहे. हा प्रकार दिघी गावठाण येथे झाला असून त्याबाबात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनीचे खोटे व बोगस नोटरी दस्त करुन बेकायदेशीर विक्रीचा दिघी गावठाणातील या प्रकाराने परिसरात खळबळ आहे.

प्रणव धोंडीबा वाळके (वय ४२, रा. दत्तनगर, दिघीगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजाराम ऊर्फ राजेंद्र लक्ष्मण ढमाले, राजश्री खंडू ढमाले, दिग्विजय राजाराम ढमाले, किरण खंडू ढमाले (सर्व रा. भोसरी गावठाण), शब्बीर इब्राहीम पटेल रा. भोसरी), स्वानंद इनामदार (रा. सारसबाग, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची वडिलोपार्जित ६६३ गुंठे जमीन भारतमाता0नगर दिघी येथे आहे. फिर्यादी यांचे वडील धोंडीबा रामभाऊ वाळके, त्यांचा एक भाउ तुकाराम (मयत), बहीण कृष्णाबाई लक्ष्मण ढमाले (मयत), बहीण जनाबाई कोंडीबा भिवरे अशी वंशावळ आहे.

वडिलोपार्जित जमिनीपैकी वडिलांची बहीण कै. कृष्णाबाई लक्ष्मण ढमाले, जनाबाई कोंडीबा भिवरे, मयत भाऊ तुकाराम यांची पत्नी लिलाबाई, मुले संजीव, अनिल व जितेंद्र या सर्वानी १९९५ साली त्यांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा ३८७ गुंठे एवढे क्षेत्र मेसर्स डायनॅमीक लॉजीस्टीक्स प्रा. लि. यांना विक्री केला. त्याची महसूल दप्तरी सातबाराला नोंद आहे. वरील व्यक्तींच्या नावे कुठेही क्षेत्र शिल्लक नाही. त्यांची सातबारा नोंद देखील नाही. त्यामुळे उर्वरित जमीन फिर्यादी यांच्या वडिलांची आहे. त्याबाबत सातबारा दप्तरी नोंद आहे.

कृष्णाबाई ढमाले या हयात असताना त्यांनी मेसर्स डायनॅमीक लॉजीस्टीक्स प्रा. लि. यांना दिलेले खरेदीखत रद्द करण्यासाठी आणि इतर वडिलोपार्जित हिस्सा मिळण्यासाठी सन १९९६ मध्ये दिवाणी न्यायालय पुणे येथे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल २० डिसेंबर २००६ रोजी आला. त्या अन्वये त्यांना काही मिळकतीमध्ये समसमान हिस्सा अंशत: मान्य केला. त्यानुसार सरस निरस वाटप होण्याबाबत दिवाणी न्यायालय पुणे येथे दावा दाखल केला होता. सन २०१३ मध्ये हा दावा पिंपरी कोर्ट येथे वाटपकामी ट्रान्सफर करण्यात आला. सन २०१७ साली फिर्यादी यांचे वडील धोंडीबा त्यांच्या भावांची मुले, कृष्णाबाई व जनाबाई यांच्यामध्ये यांच्यामध्ये तडजोड होवून वाटपाचा दावा न्यायालयातून काढून घेण्यात आला.

त्यानंतर दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी कृष्णाबाई ढमाले यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुले पांडूरंग, सुहास, राजाराम, खंडू व मुलगी सुनंदा असा परिवार आहे. त्यानंतर मयत कृष्णाबाई लक्ष्मण ढमाले यांचे वारस राजाराम लक्ष्मण ढमाले यांनी २९ जुलै २०२० रोजी पुणे न्यायालयातून न्यायालयात फिर्यादी यांचा कोणताही दावा प्रलंबीत नसताना व सन २०१७ साली पिंपरी कोर्ट येथे न्यायालयासमक्ष वाटपाबाबत तडजोड झालेली असताना देखील ती हकीगत न्यायालसमोर उघड न करता फिर्यादीवर मिळकतीच्या मोजणी व वाटपाच्या कार्यवाहीसाठी संबंधीत न्यायालयाकडून पत्र मिळविले. ते पत्र ही ऑर्डर आहे असे खोटे भासवून त्यास प्लॉटींगचा अधिकार मिळाला आहे असा संभ्रम निर्माण केला.

त्यानंतर २ डिसेंबर २०२० रोजी मिळकतीमध्ये सातबारा सदरी कोठेही नाव नसताना, क्षेत्र देखील शिल्लक नसताना तसेच सन २०१७ साली पिंपरी कोर्ट येथे न्यायालयासमक्ष वाटपाबाबत तडजोड झालेली असताना देखील मयत कृष्णाबाई लक्ष्मण ढमाले यांचे वारस व इतर सदस्यांनी कोर्टातून मिळालेल्या पत्राच्या आधारे फिर्यादी यांच्या हिश्याचे मिळकती विक्रीच्या पोटी शब्बीर इब्राहीम पटेल यांना कुलमुखत्यार पत्र लिहून दिले. हे कुलमुखत्यार पत्र हे कोर्ट कामकाज पाहणे, सरकारी दप्तरी काम पाहणे यासाठीचे आहे. मात्र कुलमुखत्यारपत्राचा बेकायदेशीरपणे गैरवापर त्यांनी फिर्यादी यांच्या मालकीच्या जमीन विक्रीसाठी करुन घेतला.

सदर कुलमुखत्यार पत्रामध्ये विक्रीचे कोणतेही अधिकार लिहून देणार म्हणजे मयत कृष्णाबाई लक्ष्मण ढमाले यांचे वारस राजाराम ऊर्फ राजेंद्र लक्ष्मण ढमाले व मुलगा दिग्विजय, मयत खंडू यांची पत्नी राजश्री व मुलगा किरण खंडू ढमाले यांना नव्हते. त्यामुळे शब्बीर इब्राहीम पटेल यांना देखील कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. असे असताना देखील कुलमुखत्यारधारक शब्बीर इब्राहीम पटेल यांनी स्वतःच्या मेरीलँड रिएलेटर्स व डेव्हलपर्स व स्वानंद इनामदार यांनी इनामदार असोसिएटस या कंपनीच्या मालकीच्या असल्याचे दाखवून भारतमातानगर येथील एकूण ५०२ गुंठे जमिनीपैकी २०९ गुंठे जमीन फिर्यादी यांच्या मालकीच्या जमीनीचे खोटे व बोगस नोटरी दस्त करुन जमीनीची बेकायदेशीर विक्री केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच फिर्यादी यांच्या मालकीच्या जमिनीवर आरोपी येऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत आहेत. त्या जागेवर अतिक्रमण करुन अनाधिकृतपणे टप-या टाकलेल्या आहेत. गाड्या पार्किंगचा व्यवसाय देखील सुरु केलेला आहे. याबाबत फिर्यादी यांनी पार्किंगमधील गाडीच्या चालकांकडे विचारणा केली असता दिग्विजय राजाराम ढमाले व किरण खंडू ढमाले हे चार ते पाच मुलांना घेऊन येत फिर्यादी यांना धक्काबुकी, शिवीगाळ केली. परत पार्किंगकडे आल्यास भोसरी गावातून अजून मुले आणून चोप देण्याचा दम दिला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.