सांगवी, दि. १९ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला सांगवी मधील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
रोहित राजू राजपूत (वय 36, रा. पिंपळे गुरव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार संतोष सेतू पवार (वय 36, रा. कोथरूड), संदीप ढाणे, नवनाथ गोरे, सिद्धार्थ खजूरकर, विजय सरोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित राजपूत यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये अश्विनी पवार यांच्या नावावर असलेली जमीन संतोष पवार यांच्या माध्यमातून विकत घेतली. या जागेचे फिनिशिंग व डेव्हलपिंग करण्याचे तोंडी आश्वासन देऊन ते संतोष पवार यांनी पूर्ण केले नाही. त्यावरून संतोष पवार याच्यासोबत रोहित राजपूत यांचे शाब्दिक वाद सुरू होते. हा वाद मिटवण्यासाठी संदीप ढाणे याने रोहित यांना सांगवी मधील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ बोलावून घेतले.
तिथे संदीप याने रोहित यांची कॉलर पकडून पीडब्ल्यूडी मैदानातील अंधारात नेले. तिथे उभारलेल्या आरोपी राजपूत याने रोहित यांना शिवीगाळ करून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर इतर आरोपींसोबत मिळून रोहित यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी संदीप ढाणे आणि सिद्धार्थ खजूरकर यांना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.