जमिनीच्या वादातून कुटुंबीयांमध्ये भांडण

0
112

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) :

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. याबाबत परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना मोरवाडी पिंपरी येथे घडली.

निलेश मारुती गायकवाड (वय 41, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंदन उमेश गायकवाड (वय 24), चंदन उमेश गायकवाड (वय 22, दोघे रा. मोरवाडी, पिंपरी), भूषण, बजरंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत मोरवाडी येथे बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी गायकवाड यांच्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यांना जमिनीवर ढकलून सिमेंट गट्टू फेकून मारला. तो गायकवाड यांनी हुकवला. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांची गर्दी जमल्याने आरोपींनी गायकवाड यांना ‘आता वाचलास पुन्हा वाचणार नाही’ अशी धमकी दिली.

याच्या परस्परविरोधात कुंदन उमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश गायकवाड (रा. पिंपरी), आकाश काशिनाथ राठोड, अरमान सलीम अत्तार, संदीप नामदेव मुरगुंड, सरफरोज (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंदन गायकवाड यांच्या वडीलोपार्जित जमिनीवर फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोकांची नावे लागली नाहीत. याचा त्यांनी आरोपी निलेश गायकवाड याला जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी कुंदन गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास संत तुकाराम नगर पोलीस करीत आहेत.