जमिनीच्या वाटणीवरून सख्या भावांमध्ये वाद

0
785

ताथवडे, दि. १३ (पीसीबी) – गावाकडे असलेल्या जमिनीची वाटणी करण्याबाबत विचारणा केली असता मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी दहा वाजताच्या सुमारास विवेकानंद नगर, ताथवडे येथे घडली.

नंदकुमार राजाराम चव्हाण (वय 56, रा.चिंचवडे नगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब राजाराम चव्हाण (वय 60), गिरीश बाळासाहेब चव्हाण (वय 35, दोघे रा. आनंद पार्क, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकुमार यांनी त्यांचा मोठा भाऊ आरोपी बाळासाहेब यास गावाकडे असलेल्या जमिनीची वाटणी कधी करायची, अशी विचारणा केली. त्यावेळी बाळासाहेब याने फिर्यादीस ‘तुझ्या चिंचवड येथील जागेत आम्हाला हिस्सा दे’ असे म्हटले. ‘चिंचवड येथील जागेत तुमचा काहीही संबंध नाही. ती मी स्वतः खरेदी केली आहे’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपी भावाने फिर्यादीस शिवीगाळ केली. बाळासाहेब याचा मुलगा गिरीश याने देखील शिवीगाळ केली. त्याला फिर्यादी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता गिरीश याने फिर्यादीच्या कानशिलात लगावली. त्यांनतर बाळासाहेब याने त्याच्या वर्कशॉप मधून लाकडी बांबू आणून त्याने फिर्यादीस मारहाण करून दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.