जमावाच्या मारहाणीत कुख्यात खुन्याचा मृत्यू…! अल्पवयीन मुलीची छेडछाड, लाथाबुक्यांनी मारहाण

0
234

अहमदनगर,दि.११(पीसीबी) – चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथील मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य ( वय ५८ ) याचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. काल ( रविवार, १० डिसेंबर ) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने त्याला संतप्त जमावाने चोप दिला. मारहाणीत गंभिर जखमी झालेल्या वैद्य याला उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले असता त्याला मृत घोषित केले.

मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य याच्यावर चार महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप होता. संगमनेर येथील ताराबाई राऊत या ४५ वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेप देखील झाली होती.

उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे राहत होता. रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली आणि त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली तसेच पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकोले पोलिसांत पोक्सो, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होत असताना त्याला उपचारासाठी रात्री संगमनेर येथे हलवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

अण्णा वैद्य याच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह चार महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर काही महिन्यांत दुसऱ्या खुनाच्या खटल्यातून संगमनेरच्या न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. तर तिसऱ्या प्रकरणात त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सिरियल किलिंग राज्यभर गाजले होते. मात्र काल जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्य याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.