सांगवी, दि. ९
सिलिंडरमधील गॅसचे वजन कमी असल्याचा बहाणा करीत चार सराईत गुन्हेगारांनी एका गॅस वितरण कर्मचार्यास लुटले. तसेच याच आरोपींनी अन्य एकालाही याच कारणावरून लुटले. ही १२ डिसेंबर २०२४ आणि ८ जानेवारी २०२५ या दिवशी नवी सांगवी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
बागी जगमलराम बिष्णोई (वय ४०, रा. पिंपळे गुरव) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय ३०, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), हरिश्चंद्र रामचंद्र साळवी (वय २५), सोहम संजय खंडारे (वय २१) आणि जगदीश एकनाथ कंकाळे (वय २१, तिघेही रा. चर्होली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिष्णोई हे गॅस सिलिंडरचा टेम्पो घेऊन चालले होते. बुधवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास ते कृष्णानगर येथे आले असता आरोपींनी त्यांचा टेम्पो अडविला. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन वैध वजनापेक्षा कमी असल्याचे सांगून फिर्यादी यांना दमदाटी केली. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण करीत शर्टाच्या खिशातून पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच १२ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास याच आरोपींनी सुनील भगवानराम बिष्णाेई यांना याच कारणावरून धमकावून आरोपी सोहम खंडारे याच्या खात्यावर ५० हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास भाग पाडले. आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे याच्यावर पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.