जप्त मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरणेची अखेरची संधी

0
2

– कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना थकीत कर भऱण्याचे आवाहन…

पिंपरी, दि. २७ : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तांवर माहे डिसेंबर २०२४ ते माहे फेब्रुवारी २०२५ या दरम्यानच्या कालावधीत आज अखेर तब्बल ८७७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत जप्त करण्यात आलेल्या ७५९ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तापैकी ३२१ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची संपूर्ण थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केल्याने जप्त केलेल्या त्यांच्या मालमत्ता मुळ मालकाच्या ताब्यात देणेत आल्या आहेत. उर्वरित ४३८ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची यादी लिलावाचा भाग म्हणून दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजीचे दै.सकाळ, दै. महाराष्ट्र टाईम्स, दै. लोकमत, दै. लोकसत्ता, दै. आज का आनंद, दै. नवभारत टाईम्स, दै. प्रभात, दै. पुण्यनगरी, दै. सामना, दै. सिव्हिक मिरर अशा सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात आली. या यादीतील थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत थकीत कर भरण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेऊन ३६ मालमत्ताधाराकांनी थकीत कराचा संपूर्ण भरणा केला असून ३६ मालमत्ताधारकांनी आंशिक भरणा केला आहे. उर्वरित, मालमत्ताधारकांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया वेगाने सुरु करण्यात आली आहे. तथापि उपरोक्त प्रक्रियेस अजून ०५ दिवसांचा कालावधी जावयाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थकीत मालमत्तांचे मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी दि. ५ मार्च २०२५ रोजी पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिनांक ५ मार्च २०२५ पूर्वी जे मालमत्ताधारक संपूर्ण कराचा भऱणा करणार नाहीत अशा मालमत्ताकरावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च लावण्यात येणार आहे. त्यामुळे दि. ५ मार्च २०२५ पर्यंत कराचा भरणा करावा अन्यथा सदर मालमत्तांचा महानगरपालिकेकडून दि. ५ मार्च २०२५ नंतर लिलाव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर सदर मालमत्ता लिलावामध्ये विकली गेली नाही तर १ रुपयाच्या नाममात्र बोलीवर महानगरपालिका सदर मालमत्ता खरेदी करणार आहे असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लिलाव प्रक्रियेमध्ये असणाऱ्या मालमत्तांपैकी ज्या मालमत्तांच्या मालमत्ताधारकांनी थकीत कराचा आंशिक भरणा केला आहे; अशा मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळल्या जाणार नसून मालमत्तेचा लिलाव टाळण्यासाठी संपूर्ण थकीत कराचा भरणा करणे आवश्यक आहे, असेही करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, लिलाव प्रक्रियेमध्ये असणाऱ्या मालमत्तेच्या थकीत करावर अधिकचे १५ टक्के लिलाव खर्चही जोडण्यात येणार असून यामुळे सदर मालमत्तेच्या कराच्या थकीत रकमेमध्ये सुध्दा वाढ होणार आहे. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरु झालेनंतर मालमत्ताधारकांना मालमत्ता लिलावातून वाचवणेसाठी अत्यंत मर्यादित संधी असल्याने, मालमत्ताधारकांनी लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध होईपर्यंत तात्काळ संपूर्ण थकीत कराचा भऱणा करुन लिलावाची प्रक्रिया टाळावी. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

आता थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरु करणार !
शहरामध्ये मालमत्ताकराची थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरु असून तात्काळ कर भरुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही कराचा भरणा केला नाही अशा मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करणेत आली आहे. ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत अशा मालमत्ताधारकांनी थकीत कराचा संपूर्ण भऱणा ५ मार्च २०२५ पूर्वी करुन आपल्या मालमत्तेचा लिलाव टाळावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जाभंळे – पाटील यांनी केले आहे.

चालू आठवड्यामध्ये लिलावाची प्रक्रिया सुरु करणार; जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालमत्ताकरावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च होणार समाविष्ट !
शहरातील ८७७ बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून यामध्ये ४०२ मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावास पात्र मालमत्तांची यादी यापूर्वीच सर्व वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्यात आली असून त्यांना २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरण्यासाठी संधी देण्यात आली होती. लिलाव प्रक्रिया सुरू करणेत आली असून अंतिम संधी म्हणून ते ५ मार्च २०२५ पूर्वी मालमत्ता कर भरून लिलावद्वारे विक्रीची कटू कारवाई टाळू शकतात, असे कर आकारणी कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.