जपान आणि भारताची घनिष्ट मैत्री शिक्षण, उद्योगासाठी उपयोगी : डॉ. फुकोहोरी यासुकाता

0
242

पीसीसीओई मध्ये जपानमधील शिक्षण, संशोधन, रोजगार संधीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन

पुणे,दि. १५(पीसीबी) – जपान आणि भारताची सुमारे पंधराव्या शतकापासून मैत्री असून गेल्या काही वर्षात ही मैत्री घनिष्ट झाली आहे. इंडो – जपान बिझनेस कौन्सिलच्या माध्यमातून दोन्ही देशांचे शिक्षण, संशोधन, औद्योगिक, सांस्कृतिक, सामाजिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जात आहे असे मत जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाचे प्रमुख डॉ . फुकोहोरी यासुकाता यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आकुर्डी येथे शुक्रवारी (दि.१४ऑक्टो.) पीसीईटी – इंडो – जपान बिझनेस कौन्सिल, जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी ‘नो जपान’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन डॉ. यासुकाता यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इंडो – जपान बिझनेस कौन्सिलचे प्रेसिडेंट डॉ. सिद्धार्थ देशमुख, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे दीपक करंदीकर, टीसीएसचे जपान वितरण व्यवस्थापक प्रशांत पेंडसे, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, जपान फिडेल टेक्नॉलॉजीच्या प्राची कुलकर्णी, जपान एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची, टोकियो विद्यापीठाच्या साक्षी रॉय, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसोओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, मानसी शिरूरकर, श्रुती चंन्नागिरी, डॉ. उमेश जोशी आदी उपस्थित होते.

या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप आज (१५ ऑक्टोबर) सायंकाळी होणार आहे. या परिषदेत विविध महाविद्यालयातील अकराशे विद्यार्थी, सुमारे शंभर औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

डॉ. यासुकाता म्हणाले, जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर तर भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली असून चीन सारख्या देशावर जागतिक स्तरावर जे शंकेचे मळभ आले, त्यानंतर अनेक जपानी कंपन्यांनी त्यांची गुंतवणूक तेथून काढून घेण्यास सुरुवात केली. एक विश्वासू सहकारी म्हणून ही गुंतवणूक भारतामध्ये करण्यास जपानी कंपन्या उत्सुक आहेत. त्यास भारताकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पॅनॉसॉनिक, सुझुकी, होण्डा यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचे विविध औद्योगिक प्रकल्प भारतात सुरु आहेत.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भारत जपान हे दोन्ही देश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. जपानची बौद्ध आणि भारताची हिंदू संस्कृती या दोन्ही शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. दोन्ही देश मिळून मोठे विकासात्मक काम उभे करू शकतात. पीसीसीओईने देशातील प्रगत शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. नुकताच संस्थेस स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. इंडो – जपान बिझनेस कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत – आधुनिक तसेच दर्जेदार शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विभाग प्रमुख यांचा संस्थेचा नावलौकीक वाढवण्यात फार मोठा सहभाग आहे, असे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

ज्ञानेश्वर लांडगे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा हेतू विषद केला. सांस्कृतिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान, रोजगार आदी विषयांवर दोन दिवसीय परिषदेत उहापोह केला जाईल. इंडो – जपान बिझनेस कौन्सिलच्या माध्यमातून पीसीसीओई मध्ये कायमस्वरूपी माहिती व मार्गदर्शन सुविधा केंद्र सुरू केले आहे असे ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इंडो – जपान बिझनेस कौन्सिलचे प्रेसिडेंट डॉ. सिद्धार्थ देशमुख, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे दीपक करंदीकर, टीसीएसचे जपान वितरण व्यवस्थापक प्रशांत पेंडसे, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, जपान फिडेल टेक्नॉलॉजीच्या प्राची कुलकर्णी, जपान एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची, टोकियो विद्यापीठाच्या साक्षी रॉय यांनी शुक्रवारच्या विविध सत्रात मार्गदर्शन केले. समन्वयक म्हणून डॉ. अनुराधा ठाकुर, डॉ. रोशनी राऊत, डॉ. शितल भंडारी, प्रा. केतन देसले, प्रा. स्वप्निल सोनकांबळे यांनी काम पाहिले. स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी, आभार डॉ. अनुराधा ठाकरे यांनी मानले.

‘यस जपान – यस इंडिया’ याव्दारेच परस्पर संबंध सुधारणा – डॉ . ज्ञानेश्वर मुळे

‘Know Japan’ म्हणजे ‘ नो – जपान ‘ असे नसून ‘यस जपान – यस इंडिया’ हाच मैत्रीचा धागा आहे. अशा मैत्रितूनच मागिल सत्तर वर्षामध्ये भारत – जपान या दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्यामध्ये प्रगती झाली आहे. जपानी नागरिक हे कायम कार्यमग्न असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना ते विचारपूर्वक, प्रामाणिकपणे आणि सचोटीने करतात. त्यांच्या या गुणाचे भारतीयांनी अनुकरण पाहिजे. रोबोटीक सायन्स, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धीमत्ता आदी तंत्रज्ञानामध्ये जपानने प्रगती केली आहे. भारताने जपानच्या सहकार्याने अशा तंत्रज्ञानामध्ये प्रगती साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे डॉ . मुळे म्हणाले.