मुंबई, दि. २३ (पीसीबी) : आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहे, तर उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, सदैव राहतील, बाकी सर्व हा औटघटकेचा खेळ असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंडाला आपल्या नावाची सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी मुंबईत केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलिस आयुक्तांना त्यांनी पत्र दिले. त्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील पोलिस पथकाने नाशिकमध्ये खासदार राऊत यांची भेट घेऊन जबाब नोंदविला.
श्री. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की काही माहिती व घटना माझ्या कानावर आली. ती संबंधित यंत्रणेला कळविली आहे. आता त्यांचे काम ते करतील, माझ्या बाजूने विषय संपला आहे. गुंडांवर मी बोलत नाही. आता पोलिस त्यांचे काम करतील. जन्मठेप व खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यांच्या पुत्रांबरोबर असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री यांच्याबद्दल आपण अपशब्द वापरला नाही. अमित शहा यांनी आमच्या नेत्याबाबत अपशब्द वापरला. त्यामुळे त्याच भाषेत आपण उत्तर दिले. त्यामुळे अमित शहा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा. मनसेचे संदीप देशपांडे यांनी खासदार राऊत यांना पत्र लिहित काही सल्ले दिले. त्या अनुषंगाने कोण संदीप देशपांडे? असा सवाल राऊत यांनी करताना मनसे हा पक्ष माझ्या खिजगणतीत देखील नसल्याचे सांगितले.
‘ते’ आता वेगळे झालेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्याच्या प्रश्नावर बोलताना शिंदे गट किंवा मिंधे गट आता वेगळे झाले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर विशेष मेहरबानी केली आहे. त्यांचे ते पाहतील, त्यांच्या कार्यकारिणीशी आम्हाला काही घेणे नाही. आम्ही, आमचा पक्ष, उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रेरणास्थान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी आशीर्वाद दिले आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी केला.