जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पीएमपी बसची धडक

0
51

चाकण, दि. 03 (पीसीबी) : जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला भरधाव पीएमपी बसने धडक दिली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी (दि. 2) सकाळी दहा वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर वाकी येथे घडला.

सत्यम सिंग, ओंकार देवकर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी धनराज उत्तम डहाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमटी बस चालक प्रकाश मधुकर गायकवाड (रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनराज हे त्यांच्या कॅरी गाडीमधून बैल घेऊन जात होते. पुणे-नाशिक महामार्गाने जात असताना वाकी खुर्द येथे स्पीड ब्रेकर जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीला पाठीमागे आलेल्या पीएमपी बसने जोरात धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांची कॅरी गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीतील सत्यम सिंग आणि गाडी समोरून जाणारा ओमकार देवकर हे दोघेजण जखमी झाले. या अपघातात कॅरी गाडी आणि पीएमटी बस या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.