जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका; चित्रा वाघ यांना न्यायालयाचे खडे बोल

0
108

मुंबई 8 ऑगस्ट (पीसीबी) – : पुणे येथे फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून झालेल्या तरुणीच्या कथित मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी जनहित याचिका केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी वाघ यांनी बुधवारी केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेतला. तसेच, वाघ यांच्यासारखे राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून न्यायालयांना त्यात विनाकारण ओढत आहेत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही, असे ताशेरेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले. न्यायालयाच्या या पवित्र्यानंतर याचिका मागे घेणार नसल्याचे वाघ यांना वकिलामार्फत न्यायालयाला सांगावे लागले.

टिकटॉक व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरुणीचा ८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच सदर तरुणीचे राठोड यांच्याशी नाव जोडले गेले. राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाघ यांनी २०२१ मध्येच उच्च न्यायालयात याचिका केली होती.