पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ४६ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, ३, २, ५, ५, ३, ३ आणि १२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये मुख्यत्वे खराब झालेल्या ड्रेनेज लाईन्स दुरूस्त करण्यात याव्यात आणि अशा सूचनांचा समावेश होता. प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांसाठी टेबल खुर्चीची व्यवस्था करावी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी शहर परिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या सूचनाही नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या समस्यां दूर व्हाव्यात यासाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.