जनसंवाद सभेत नागरिकांच्या विविध तक्रारी व सूचना

0
252

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, ड्रेनेज लाईन्स दुरूस्त कराव्यात आणि पादचारी मार्गावर होणारे अतिक्रमण हटवण्यात यावे या तक्रारींचा मुख्यत्वे समावेश होता. तसेच स्टॉर्म वॉटर लाईन दुरूस्त कराव्यात, अनाधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात यावी, बसथांब्यांचे नुतनीकरण करण्यात यावे, शहरात वाढणाऱ्या रहदारीचे योग्य नियोजन करण्यात यावे, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा अशा तक्रारींचाही समावेश होता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६४ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, १०, ६ ५, ४, ८, ४ आणि १४ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषविले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.