पुणे, दि. २८ (पीसीबी) : वीज बिल थकीत असल्याने घराचा वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या दोन जनमित्रांना बुक्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना चाकण पोलीसांनी तत्काळ अटक केली आहे तर एकाचा शोध सुरु आहे. रविवारी (दि. २६) सकाळी ११.३० च्या सुमारास हा मारहाणीचा प्रकार घडला.
याबाबत माहिती अशी की, चाकण येथील महावितरणचे विद्युत सहायक श्री. मयूर चंद्रकांत चौधरी हे सहकारी प्रदीप शेवरे यांच्यासमवेत रविवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजता आंबेठाण रस्त्यावरील साईसाम्राज्य सोसायटीमध्ये एका वीजग्राहकाच्या तक्रारीनुसार वीजमीटर बदलण्यासाठी गेले होते. या सोसायटीमधून परत जाताना अक्षय पन्नालाल चोरडिया याने मयूर चौधरी व प्रदीप शेवरे यांना थांबवले आणि १५ दिवसांपूर्वी घराचा वीजपुरवठा खंडित का केला होता अशी विचारणा केली. यावर वीजबिल थकीत असल्याने नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे या दोहोंकडून सांगण्यात आले. मात्र अक्षय चोरडिया याने वाद घालण्यास सुरवात केली तसेच सोसायटीच्या बाहेर कसे जाता ते पाहतो असे म्हणत दुचाकी वाहनाची चावी काढून घेतली.
दरम्यान शासकीय कर्तव्य म्हणून नियमानुसार थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे समजून सांगत असताना आकाश पन्नालाल चोरडिया तेथे आला व जनमित्र मयूर यास पट्ट्याने मारहाण सुरु केली. जनमित्र प्रदीपने त्यास सोडविण्याचा प्रयत्न केला असता अक्षयने त्यांच्या पोटावर बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पन्नालाल चोरडियाकडून देखील जनमित्रांना शिविगाळ करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी तेथे आले. त्यांनी व सोसायटीमधील नागरिकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश चोरडिया याने सोसायटीमधून लोखंडी रॉड आणला व जनमित्र मयूर यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात मयूर यांचे डोके फुटले व रक्त निघाले. त्यानंतर आकाशने बोलावलेल्या एका अनोळखी व्यक्तीनेही मयूर यांना मारहाण केली.
जखमी झालेल्या मयूर चौधरी यांना इतर सहकाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यानंतर महावितरणकडून चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी अक्षय पन्नालाल चोरडिया, आकाश पन्नालाल चोरडिया, पन्नालाल शंकरलाल चोरडिया व एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी भादंवि कलम ३५३, ३४२, ३३२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे व तीन आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे.












































