जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले – पंतप्रधान नरेन्द्र मोदी

0
8

दि. २7 (पीसीबी) – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…

राहुल, प्रियांका, खरगे यांची आदरांजली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील सर्वच नेत्यांनी एक्सद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मनमोहन सिंग यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.

काय आहे राहुल गांधींची पोस्ट?
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.

मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होती
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.