राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यातील २९ पैकी जवळपास २५ महापालिका भाजपा आणि महायुतीने जिंकल्या. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्र आले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यानंतरही पुणेकरांनी प्रतिसाद न दिल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आलेल्या अपयशानंतर आणि राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो आणि आम्ही तो पूर्ण आदरानं स्वीकारतो, तसेच जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करत राहू’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी भाजपावर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप
अजित पवार यांनी प्रचारवेळी पिंपरी-चिंडवडमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार टीका केली होती. अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं. पुणे आणि पिंपरी-चिंडवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी अनेक मोठी आश्वासने दिली होती. मोफत बस व मेट्रो प्रवासाच्या आश्वासनासह आदी मोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र, तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.












































