“जनता फक्त निवडणूकीची वाट पाहतेय,”, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘आप’चा पाठिंबा

0
62

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी) पुणे,: गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परिक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस परिक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परिक्षा या दोन परिक्षा एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांना एका परिक्षेला मुकावं लागणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सरकार दरबारी वारंवार मागणी करून देखील त्याची पुरेशी दखल घेतली नसल्याने परिक्षार्थी रस्त्यावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यातच आज आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

यावेळी चेतन बेंद्रे म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून एमपीएससी (MPSC) परिक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएस (IBPS) परिक्षा आणि एमपीएससीकडून (MPSC) घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परिक्षा एकाच दिवशी ठेवल्याने एका परिक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागणार आहे. असंवेदनशील, बेजबाबदार भाजपा सरकार आणि शासकीय यंत्रणेंच्या हलगर्जीपणामुळे याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. परंतु सरकाराने साधी दखलही घेतली नाही, याचा अर्थ सामान्याचे सरकारला काहीही देणे-घेणे नाही. फक्त अदानी अंबानी तसेच मोठमोठे व्यावसायिक, ठेकेदार यांच्यासाठी भाजपला सत्ता पाहिजे. जनतेच्या मनातून तर हे सरकार कधीच उतरले आहे, आता जनता फक्त निवडणुकीची वाट पाहतेय.

यावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासोबत चेतन बेंद्रें यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच हा लढा प्रस्थापित विरूद्ध सामान्य माणसाचा आहे. आता एकच मिशन, नोटिफिकेशन असं म्हणत चेतन बेंद्रें यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही दिली.