पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून, असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत, असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
‘पंतप्रधान मोदी हे विषारी साप’ असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबत आमदार लांडगे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. आमदार लांडगे म्हणाले की, याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. ‘‘मौत का सौदागर, खून का दलाल’’ अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले असून, अशाच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकीदेखील गमवावी लागली आहे. त्यामुळे आता गांधी परिवाराची भाषा त्यांचे निष्ठावंत हुजरे बोलू लागले आहेत, अशी टीकाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
देशाच्या पंतप्रधानांविषयी अशी बेताल वक्तव्ये करून अगोदरच धुळीस मिळालेली पक्षाची प्रतिमा रसातळाला नेत असल्याचे भान कॉंग्रेसी पोपटांना नाही, पण जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देतानाच, या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशाची माफी मागावी.