जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल – अजित पवार

0
157

मुंबई,दि.०३(पीसीबी) – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असताना नव्या सरकारमध्ये नवी गणितं जुळत असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात भाजपाचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले. नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ‘गणपती दर्शना’साठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर बोलताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. शिवसेनेच्यचा दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर अजित पवारांनी बाळासाहेबांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. “वर्षानुवर्ष सगळी महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना जेव्हापासून झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल”, असं अजित पवार म्हणाले.

“ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. आणि निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी सध्या सुरू असलेल्या भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींवर टोलेबाजी केली. “तुम्हीच ओळखा..याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?”, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.