जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी

0
262

नागपूर, दि. १३ (पीसीबी) – रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पिठावर निनावी पत्राद्वारे राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्रामध्ये तुम्ही जे अयोध्या-अयोध्या करत आहात ते महागात पडेल, आज नाही तर उद्या तुमचा अंत निश्चित आहे, अशी धमकी पत्राद्वारे महाराजांना देण्यात आली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे. त्यानंतर त्यांच्या अयोध्येत जाण्यासाठीची तयारी सुरु झाली होती. पण या दरम्यान, अचानक जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित धमकीचं पत्र समोर आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कुर्हा येथील पोलीस ठाण्यामध्ये जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विदर्भ पीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज निवदेन दिलं.

‘महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांना सुरक्षा द्या’, महाराजांच्या अनुयायांची मागणी
स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांच्या अनुयायांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना आठ दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं विशेष निमंत्रण आलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व ट्रस्टी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत असताना काल एक घटना घडली. स्वामीजींना धमकी वजा इशाऱ्याचं एक पत्र आलं आहे. त्यात स्पेशल उल्लेख केलाय की, तुम्ही अयोध्याला गेलात तुमचा अंत निश्चित आहे. आम्ही सर्वांनी या पत्राचं गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. त्यानंतर आज लगेच आम्ही एसपींना भेटलो”, असं महाराजांच्या अनुयायांनी सांगितलं.

“आमची सरकारला एवढीच विनंती आहे की, जगद्गुरु रामराजेश्वर महाराजांना तात्काळ सुरक्षा पोहोचवावी. तसेच भारतात आज एक विचित्र वातावरण होतंय. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा साधुसंताना छेडलं जातंय, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. अमरावतीतही बरेचसे साधुसंत आहेत जे अयोध्येला जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासोबतही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी शासनाला विनंती करेन की, आपण महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांना सुरक्षा द्यावी”, असं महाराजांचे अनुयायी म्हणाले.