जगताप दाम्पत्य आहे कोट्याधीश ! पण दोघांच्या नावावर एकही गाडी नाही….

0
256

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी सोमवारी (ता.६)आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अश्विनी जगताप यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्या व त्यांचे पती हे ही कोट्यधीश आहेत. तरीही त्या दोघांकडेही स्वत:ची मोटार नाही.

अश्विनी जगताप या दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांची शेती आणि व्यवसाय आहे. दोघांचीही एकूण ३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात अश्विनी जगताप यांची स्वत:ची एकूण मालमत्ता १३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर पतीची १८ कोटींची संपत्ती आहे. मात्र, अश्विनी यांची जंगम मालमत्ता (११ कोटी) ही पतीच्या जंगम मालमत्तेपेक्षा (साडेपाच कोटी) जास्त आहे.

त्यांच्या जंगम मालमत्तेत सोने, चांदी, जडजवाहिरच दोन कोटी २२ लाख ६१ हजार ३८३ रुपयांचे आहे. मात्र, स्थावर (शेती,बिगरशेती,इमारती) मालमत्ता ही दिवंगत आ. जगतापांची जास्त म्हणजे १३ कोटी रुपये असून ती अश्विनी यांची तीन कोटी रुपये आहे. तर दिवंगत जगतापांकडे ७८ हजार रुपयांच एक परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि एक रिव्हॉल्वर आहे.

अश्विनी जगताप यांची बॅंकेत पावणे सत्तावीस लाख रुपये, तर पतीचे पावणेचार कोटी रुपयांची शिल्लक (बचत खाते,ठेवी) आहे. अश्विनी यांच्याकडे साडेसात लाख रुपये मूल्याची शेतजमीन आणि पावणेतीन कोटी रुपयांची बिगर शेतजमीन, तर पतीची साडेतीन कोटी रुपयांची शेती आणि पावणेसात कोटी रुपयांची बिगर शेतजमीन आहे. त्यांना १२ लाख रुपयांचे देणे त्यांच्याच चंद्ररंग डेव्हलपर्सला आहे. तर,त्यांच्या पतीच्या कर्जाची रक्कम सव्वासहा कोटी रुपये असून ते आपले दोन्ही भाऊ शंकर आणि विजय जगताप यांनाच देणे लागतात.