जगताप कुटुंब फोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला गेला मात्र जगताप कुटुंब सदैव सोबतच राहणार!

0
448

पिंपरी, दि. : १४ (पीसीबी)- कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या विघ्नसंतुष्ट मंडळींचे आभार मानून लक्ष्मणभाऊंचे बंधू शंकरराव जगताप यांनी आपल्या उद्विग्न भावना मोकळ्या केल्या. आपल्या वहिनी कालवश आमदार लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोट निवडणुकीतील विजयानिमत्त आयोजित आभार मेळाव्यात त्यांनी आपल्या शब्दांना वाट करून दिली. परकियांबरोबरच स्वकीयांनी देखील कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही शंकरराव यांनी दिली.

त्याचबरोबर अशी वेळ दुश्मनांवरही येऊ नये असे साकडेही जनता जनार्दनासमोर घातले. या आभार मेळाव्यात कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिक, मतदार, कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे, मावळचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळा भेगडे, भोसरीचे आमदार आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांसह शहरातील भाजप आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसदस्य आदी मंडळी उपस्थित होती. 

प्रश्न निर्माण होतो तो हा की, शंकररावांनी स्वकीय आणि परकीय या दोहोंनीही कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. मात्र, या परकीयांमध्ये राजकीय विरोधकांपेक्षा वेगळे कोण होते काय, याचे स्पष्टीकरण करणे मुद्दामून टाळले. कोणाची राजकीय महत्त्वाकांक्षा कुरवाळण्यासाठी कोणत्या स्वकीय आणि परकीय शक्ती काम करीत होत्या, याचाही उल्लेख टाळला. स्वकीयांबाबत बोलताना त्यांनी कुटुंबातीलच काही व्यक्ती राजकारणातील सवंगतेला बळी पडल्या अशी अप्रत्यक्ष कबुलीही शंकरराव जगताप यांनी दिली. कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर या स्वकीय अथवा परकीय शक्ती जागृत झाल्या, असा कायसही त्यांनी व्यक्त केला. भाऊंच्या निधनाला उणेपूरे पंधरा दिवस लोटले होते, कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला होता, भाऊंच्या कुटुंबाप्रमाणेच ऱ्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना आपल्या कुटुंबातील एक मानणाऱ्या प्रत्येकाला दुखः झाले होते. अशा दुखःद परिस्थितीत देखील कोणी स्वकीय राजकीय महात्त्वाकांक्षेने पछाडले असेल आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मारले जाणार आहे, याची भीती त्या स्वकीयाला असेल तर, कुटुंबात सफल काही आलबेल नाही असेच दृश्य निदान बाहेरच्या लोकांसमोर तरी नक्कीच निर्माण होईल.

ज्याच्या पाठीवरुन या जगात आलो, तो मोठा भाऊ आता चुका सांगायला, पाठीवर शाबासकीची थाप मारायला, आपल्या भल्याबऱ्याची भलावण करायला नाही, हे आभाळभर दुखः शंकरराव जगताप यांच्या उरी पहाडासारखे आदळले होते. लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी यांना तर सगळे जगच परके झाले होते. आपले कोण, परके कोण, हितसंबंधी कोण, हितशत्रू कोण, आपले सहदूखीः कोण, दु:स्वासी कोण हे त्या माउलीला पुरते उमगलेही नव्हते. अशा परिस्थितीत राजकीय गणिते मांडून भाजपने भाऊंची महिन्याची भाकरही होऊ द्यायची वाट न पाहता या कुटुंबावर पोट निवडणूक अक्षरशः लादली. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मग अनेक मंडळी सरसावली. कालवश लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबात फट शोधून फूट पडण्याच्या प्रयत्नात राजकीय विरोधकांबरोबरच स्वकीय देखील सामील झाले.

मात्र, आपले पहाडाएव्हढे दुखः बाजूला ठेऊन हे धीराचे कुटुंब एकोप्याने आणि एकशक्तीने परिस्थितीला सामोरे गेले. अनेकांच्या राजकीय आसूयेला मूठमाती देऊन भाऊंच्या पश्चात भाऊंच्याच प्रेरणा घेऊन या कुटुंबाने उभारी घेतली. होत्यानव्हत्याची मोट बांधून पूर्ण ताकद लावून निवडणूकीचा विजय खेचून आणला. आभार मानताना मात्र, शंकरराव जगताप यांनी आपला सल उघड केला. आता कोणत्याही परिस्थितीत कुटुंबात फट दिसणार नाही, याची खात्री मात्र, या कुटुंबाने करून घ्यावी, ही या सर्व बाबींची शिकवण म्हणावी लागेल. भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी या आभार मेळाव्यात जमलेल्या कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यासाठी निवडणूक मारणाऱ्या सर्व उपस्थितांना पंचांग प्रणाम केला. अनेक शक्ती एकत्र येऊनही लक्ष्मणभाऊंचा वारसा कायम ठेवणाऱ्या, कोणत्याही प्रकारचा किंतुपरंतु न ठेवता भाऊंची बूज राखणाऱ्या आम जनतेचा आदर राखण्याचा आणि आभार मानण्याचा हा प्रकार होता, असेच म्हणावे लागेल.