जगताप कुटुंबाला उमेदवारी, आता भाजपसाठी मोठी रिस्क

0
173

चिंचवड, दि. १४ जुलै (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर एकहाती नेतृत्व राहिले नसल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी अक्षरशः साठमारी सुरू झाल्याचे चित्र आहे. २००९ पासून जगताप यांनी या मतदारसंघावर स्वतःचे वर्चस्व कायम ठेवले. २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते कमळ चिन्हावर आमदार झाले. केवळ त्यांच्या सांगण्यावर ४० वर समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. शहरात भाजपची ताकद वाढली आणि अजित पवार यांची हुकूमत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत बहुमताने सत्तासुध्दा आली. इतकेच काय शहर भाजपमय कऱण्याचे सारे श्रेय जगताप यांना जाते. शहराचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी ते सांगतील तेच होत. चिंचवड विधानसभेसाठी लक्ष्मण जगताप यांच्याशिवाय कोणाचे नाव चर्चेतसुध्दा येत नसे. दरम्यान, दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आणि शहर भाजप पोरकी झाली. मात्र, राजकारणात त्यांचा जो दबदबा होता तो संपला. इतका की निधनानंतर त्यांच्या घरातून उमेदवार असला तरी तो पराभूत होईल की काय, असे वातावरण होते. चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली. सहानुभूतीचा फायदा मिळावा म्हणून जगताप यांच्या धर्मपत्नी श्रीमती अश्विनी जगताप यांनी संधी देण्यात आली. भाजपची ताकद घटल्याने विरोधक प्रबळ झाले. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही निष्फळ झाला. खरे तर, अटितटीचा सामना झाला. सर्वेक्षणात भाजपचा पराभव होणार याचा अंदाज आल्याने खुद्द फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळी केली. राहुल कलाटे यांची अपक्ष उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडली. त्यांना तब्बल ४४ हजार मते मिळाली आणि जगताप विरोधी मतांचे विभाजन झाले आणि आश्विनी जगताप ३५ हजारांनी जिंकल्या. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना तब्बल ९९ हजार मते मिळाली होती. कलाटे यांची बंडखोरी नसती तर तिथेच जगताप यांच्या राजकारणाला विराम मिळाला असता. यावेळी हवेची दिशा ओळखून जगताप कुटुंबाच्या विरोधात भाजपमध्येच आता चक्क चार प्रबळ इच्छुक तयार झाल्याने पक्षाची कोंडी झाली आहे.


विधानसभा पुन्हा लढायचीच या निर्धाराने आमदार श्रीमती जगताप यांनी स्वतः जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे त्यांचे सख्खे दिर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी उमेदवारी मलाच मिळणार असे जाहीर करून पायाला भिंगरी लावल्यासारखे दौरे, गाठीभेटी, कार्यक्रम सुरू केलेत. दिर भावजयींच्या या वादात भाजप अडचणीत आली.


जगताप यांच्या हयातीत कोणी तोंड उघडायची हिंमत करत नव्हते, आता सगळे उसळून आलेत. ज्यांना ज्यांना आमदार जगताप यांनी त्यांच्या हयातीमध्ये डावलले ते सगळेच आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. श्रीमती जगताप यांना उमेदवारी मिळालीच तर त्यांचे दीर आणि पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेठ हे पक्षांतर करून थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची तुतारी हातात घेतील अशी चर्चा सुरू आहे. कुटुंबकलह इतका टोकाला गेल्याने शहर भाजपमधील कार्यकर्ते हतबल आहेत. दुसरीकडे शंकरशेठ जगताप यांना उमेदवारी दिलीच तर भाजपचे १५ वर माजी नगरसेवक पक्षातून बाहेर पडतील आणि विरोधकांना मदत करतील, असा इशारा अनेकांनी दिला. जगताप कुटुंबातील एकालाही उमेदवारी न देता बाहेरचा उमेदवार द्यावा म्हणून मागणी जोर धरू लागली. एकेकाही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक असलेल्या स्वसामर्थ्यावर कायम जिंकणाऱ्या शत्रुघ्न काटे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधनी सुरू केली आहे. आता खूप झाले, आपण यावेळी लढणारच असे ते सांगतात. काटे यांना महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देतो, असे सांगत पाच वर्षे झुलवले आणि फसवले. आता ते अक्षरशः इरेला पेटलेत. शंकर जगताप यांना पक्षाचे शहराध्यक्ष करू नये म्हणून त्यांच्यासह भाजपच्या १५ नगरसेवकांनी उठाव केला होता. भाजपमधून दुसरे प्रबळ दावेदार माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. जगताप कुटुंबा बाहेरचा उमेदवार द्यायची वेळ आल्यास त्यांचे नाव अग्रभागी असेल, असे आश्वासन त्यांना प्रदेश भाजपमधून तसेच रा.स्व.संघातील काही नेत्यांनी दिल्याने ते तयारीला लागलेत. प्रमुख कार्यकर्त्यांच्या तसेच मतदारांच्या गाठीभेटीवर त्यांचा भर आहे. आता उमेदवारी मिळो न मिळो लढायचेच असे ते सांगतात. विशेषतः जगताप कुटुंबात उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातून जिथे जगताप यांना मोठे मताधिक्य मिळत असे तिथे नखाते यांचा प्रभाव असल्याने आता भाजप अडचणीत आहे. थेरगाव परिसरातील राजकारणावर गेली पन्नास वर्षे ज्या घराण्याची मांड पक्की आहे, त्या माजी नगरसेवक सिध्देश्वर बारणे यांनीही भाजपकडे इच्छा व्यक्त केली आहे. चार टर्म नगरसेवक तसेच माजी उपमहापौर झामाबाई बारणे या त्यांच्या मातोश्री तर, थेरगावचे तीन वेळा सरपंच राहिलेले बाळासाहेब बारणे हे त्यांचे पिताश्री आहेत. जगताप यांनी भाजपच्या सत्ता काळात महिला महापौर करणार म्हणून ज्यांना चकवा दिला त्या माजी नगरसेविका माया बारणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

विधानसभा लढायचीच म्हणून त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्क अभियान सुरू केले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे निमित्त करून किमान २५ हजारावर नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला. चिंचवडमधून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमधून आणखी काही सूप्त इच्छुकांचीही नावे चर्चेत आहेत.


जगताप यांच्या कार्यशैलीमुळे नाराजांची संख्या मोठी आहे. विरोधकांपैकी जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. आजवर थांबलो, आता नाही. यावेळी मी लढणार आणि जिंकणारच, असा भोईर यांचा निर्धार आहे. चिंचवडगाव आणि परिसरातून भाजपला कायम मताधिक्य मिळते, तिथेच खुद्द भोईर यांची वैयक्तीक ५० हजारावर गठ्ठा मते आहेत. नाट्य चळवळीतून राज्यात नाव कमावलेले भोईर यांच्याबद्दल सहानुभूती असलेला मोठा वर्ग भाजपमध्ये आहे. गेल्या पोटनिवडणुकित ९९ हजार मते घेणारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे हेसुध्दा दंड थोपटून आहेत. सलग तीन वेळा निवडणूक लढविलेल्या माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचेही नाव जगताप यांच्या विरोधकांपैकी आहे. त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने रंगत वाढली आहे. वाकड परिसरात राहुलदादा यांचा शब्द प्रमाण असतो आणि तिथेच भाजपचे पॉकेट व्होट आहे.


पिंपळे सौदागर हे त्यांचे प्रभाव क्षेत्र कायम आहे. पिंपळे गुरव हे पहिल्यापासून लक्ष्मण जगातप यांचे प्रभाव क्षेत्र होते. आता घरातूनच भाऊबंदकीचे आव्हान मिळाले आहे. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी तलवार उपसली नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीतील सर्वच इच्छुक हे आपापल्या परिसरातील दमदार नेते आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जगताप कुटुंबाचा दबदबा विरळ झाला म्हणा की संपला म्हणा. आता सर्व जगताप विरोधकांनीच उचल खाल्ली असून या कुटुंबात उमेदवारी देऊन रिस्क घ्यायची का, या विचारात भाजपचे नेते आहेत. भाजपकडून ही जागा हिसकावून घेणे आता खूप सोपे असल्याचा अंदाज आल्याने महाआघाडीचे नेते खुद्द शरद पवार यांनी जातीने लक्ष घातल्याचे समजले. महिनाभरात चित्र स्पष्ट होईल, पण आता भाजपचा उमेदवार कोणीही असो त्याची कसोटी लागणार आहे.