जगताप कुटुंबाच्या घराणेशाही विरोधात भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा अंतिम इशारा…

0
101

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – भाजपची उमेदवारी जगताप कुटुंबाच्या घरात दिल्यास विरोधाची धार आणखी तीव्र करायचा निर्णय भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केला आहे. २२ वर्षे एकाच घरात आमदारकी असेल तर आम्ही वेगळा विचार करून असा अंतिम इशारा या मंडळींनी आज रहाटणी येथे झालेल्या बैठकितून दिला. माजी नगरसवेक आणि चिंचवड विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या चंद्रकांत नखाते यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित कऱण्यात आली होती. भाजप नेत्यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला घ्या अशी विनंती केल्याने आजवर शांत आहोत, आता आम्हाला निर्णय करावा लागेल असा इशारा सर्वांनी दिला.
या बैठकीला नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे,संदिप कस्पटे, कैलास बारणे, सिद्धेश्वर बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, सुनिताताई तापकीर, सविता नखाते यांसह भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर, मा.शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर आदि प्रमुख उपस्थित होते.

बैठकित सर्वांनी कडक शब्दांत मतप्रदर्शन केले. सर्वांचे नेतृत्व करणारे शत्रुघ्न काटे म्हणाले, चिंचवड विधानसभेत भारतीय जनता पार्टीला माननारा एक मोठा मतदार वर्ग आहे की जो एखादी व्यक्ती किंवा घराणेशाही नाही तर पक्षाला, हिंदुत्ववादी विचारधारेला महत्व देतो. त्यामुळे एकाच कुटुंबात एकाच छताखाली राहणारे सख्ख्या दीर-भावजय यांना महत्वाची पदे देणे हे हिंदुत्ववादी विचारांवर मतदान करणाऱ्या मतदारांना आवडलेले नाहीये व आता तर ते बोलूही लागले आहेत. जशजशी विधानसभा निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसा चिंचवड विधानसभेतील जगताप परीवाराचा विरोध शमण्याऐवजी तो वाढतच चालला आहे.

२००९ मधे चिंचवड विधानसभेतून लक्ष्मण जगताप अवघ्या ६ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मधे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात विद्यमान आमदार असलेल्या आपल्याच चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप हे तब्बल ६० हजार मतांनी पिछाडी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ मधे आलेली लाट व महाराष्ट्र विधानसभेत होणारे परीवर्तन यांचे वेध लक्षात घेऊन दूरदूष्टीकोन असणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची डूबती नैय्या सोडली व भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि २०१४ च्या विधानसभेत भाजपची उमेदवारी मिळवली व विजयी झाले असे काटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

२०१९ मधे लक्ष्मण जगताप यांचे पूर्वाश्रमीचे नेते अजित पवार यांनी चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभेतील उभं केले जगताप यांनी प्रथम महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्यासाठी प्रथम खूप आढेवेढे घेतले. अक्षरश: भाजपा नेते गिरीश महाजन यांना समेट घडविण्यायाठी दोनदा चिंचवड मधे यावे लागले शेवटी संघाचे स्वयंसेवक व भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट महायुतीचे काम सुरू केल्यामुळे व जनतेचा महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहून जगताप यांची चांगलीच पंचाईत झाली त्यामुळे नाईलाजाने त्यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उतरावे लागले, असा इशारा नखाते यांनी दिला.

या निवडणूकीत आप्पा बारणे यांना चिंचवड विधानसभेतून तब्बल ९६ हजार मतांचा लीड मिळाले. याउलट परीस्थिती २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत झाली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड विधानसभेची जाग राष्ट्रवादीच्या वाट्याला आली परंतु राष्ट्रवादी ऐनवेळेस लक्ष्मण जगताप यांच्या समोर उमेदवारच दिला नाही शेवटी राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला महायुतीकडे भाजपा, शिवसेना, आरपीआय व संघपरीवार शिवाय सर्व नगरसेवक अशी भलीमोठी कार्यकर्त्यांची मोठी फौज असून देखिल बारणे यांच्या तुलनेत जगताप अत्यंत नगन्य म्हणजे अवघ्या ३८ हजार मतांचे लीड मिळाले.

लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ३६ हजार मते, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना १ लाख तर अपक्ष उमेदवार कलाटे यांना ४६ हजार मते व इतर उमेदवारांना ८ हजार मते मिळाली याचाच अर्थ दीड लाखांपेक्षा जास्त मते जगताप यांच्या विरोधात आहेत व हिच बाब जगताप विरोधकांनी ताडली आहे एकीकडे जगताप विरोधक अजित पवार गटातील नगरसेवक एकत्र बैठका घेत आहेत तर भाजपाच्या गोटात यांच्या कार्यपद्धतीला व घराणेशाहीला विरोध करीत लोकसभा निवडणूकी आधीच भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे, नवनाथ जगताप, माया बारणे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले यांनी पक्षाला रामराम केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभेत ज्यांनी चार-चार चा पॅनल निवडून आणले आहेत असे मातब्बर नगरसेवकांनी एकत्र येत घराणेशाहीला तीव्र विरोध केला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील किंवा पक्षाचे आजपर्यंतचे सर्वच मोठे नेते यांनी नेहमीच एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महत्वाची पदे देण्यास विरोध केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने देखिल घराणेशाहीला महत्व न देता एकाच कुटुंबात सर्व महत्वाची पदे देण्या ऐवजी या सर्व पदांना योग्य न्याय देऊ शकतात अशा कार्यकर्त्यांना समान न्यायाने वाटप करावे अशी एकमुखी मागणी या बैठकीत सर्वांनी केली आणि ‘जगताप’ सोडून आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी द्या..आम्ही काम तर करूच व निवडूणही आणू असा निर्धार देखिल यावेळी या सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी केला.
पक्षाच्या वरीष्ठांनी आम्हाला संपर्क केला आहे परंतू आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि जर का पक्षाने दखल घेतली नाही तर आम्ही १४ ते १५ नगरसेवक वेगळी भूमिका घेऊन आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा देखिल यावेळी सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी दिला आहे.