जगणे सुंदर करणे आपल्याच हाती – राजेंद्र घावटे

0
95

मोरवाडी (पिंपरी) : “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो.” असे प्रतिपादन लेखक आणि व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे.

मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत “जगणे सुंदर आहे” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी आर माडगूळकर हे होते. तर व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, उद्योजक भगवान पठारे, संघाचे मार्गदर्शक यशवंत आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, ” आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा देत समृद्धीकडे वाटचाल करता येते. सिंहावलोकन करून जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. निसर्गाचा संग, अध्यात्म, पर्यटन, कौटुंबिक जिव्हाळा, विविध छंद, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आदींसाठी केलेले काम यातून आयुष्य जगताना उत्तम अनुभूती मिळते. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात आला पाहिजे.” असे सांगताना घावटे अनेक उदाहरणे सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन उल्हास झिरपे यांनी केले