छेड काढल्यावरून सावरदरीत डबल मर्डर

0
498

चाकण, दि. १० (पीसीबी) – महिलेची छेड काढल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकूने वार करून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.

सुरज नंदकुमार चव्हाण (वय 27), अनिकेत किसन पवार (वय 24, दोघे रा. सावरदरी, ता. खेड) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज यांच्या पत्नीने महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप दिलीप भगत (रा. सावरदरी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज चव्हाण यांच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेची आरोपी छेड काढून त्रास देत असे. आरोपीने शनिवारी त्या महिलेच्या घराच्या बाथरूमची खिडकी फोडली. त्यामुळे सुरज चव्हाण आणि अनिकेत पवार हे प्रदीप याला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रदीप याने सुरज आणि अनिकेत यांच्यावर चाकूसारख्या हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.