दि. 21 (पीसीबी) – छावा चित्रपटाच्या कथानक, कास्ट आणि एकूणच मांडणीबद्दल विविध वादविवाद सुरू असतानाच तिकडे बहुतेक सर्व शहरात आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रात या कलाकृतिने धमाका केला आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट व्हॅलेंटाईन डेला(14 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चर्चेत असलेल्या आणि बिग बजेट ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
प्रदर्शनाच्या दिवसापासूनच ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केवळ देशातच नाही, तर जगभरात ‘छावा’ची चर्चा आहे. विकी कौशलचा (Vicky Kaushal) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ‘छावा’ने प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल 31 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 219 कोटींची कमाई केली, तर आठव्या दिवशी 23 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 242.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.
कलाकार आणि दिग्दर्शन
‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे मराठी कलाकार आहेत.