छापखान्यांतून ‘500’ रुपयांच्या ‘अब्जावधी’ नोटा रिजर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास

0
296

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – केंद्र सरकार काळा पैसा धुंडाळत असताना नाशिक, देवास आणि बंगळूरमधील छापखान्यांतून पाचशे रुपयांच्या 1 हजार 761 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या कालावधीत रघुराम राजन हे गव्हर्नर होते; पण त्या नोटांवर स्वाक्षरी कोणाच्या होत्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गायब झालेल्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या असून, त्याचे मूल्य 880 अब्ज 32 कोटी 50 लाख रुपये (8,80,32,50,00,000) इतके आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी 7 हजार 260 दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेनेच उघड केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

करन्सी नोट प्रेस नाशिक, बँक नोट प्रेस देवास आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रांक प्रा. लिमिटेड बंगळूर येथील करन्सी नोट छापखान्यांतून भारतीय रिझर्व्ह बँक नोटा खरेदी करते. खरेदी केलेल्या नोटांचे या बँकेकडून देशभर वितरण केले जाते. नाशिक करन्सी प्रेसमधून एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत 500 रुपयांच्या 210 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठविल्या होत्या. एप्रिल 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत 345 दशलक्ष, तर एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 1 हजार 662 दशलक्ष नोटा पाठविल्या होत्या.

बंगळूर प्रेसमधून याच कालावधीत 5,195.65 दशलक्ष आणि देवासकडून 1,953 दशलक्ष नोटा, अशा एकूण 8,810.65 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला पाठविल्या असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन एस. रॉय यांना कळवले आहे. मात्र, यापैकी केवळ 7,260 दशलक्ष नोटा मिळाल्या असल्याचे रिझर्व्ह बँकेने 2016-17 च्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यावरून एकूण 1,760.65 दशलक्ष नोटा गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या नोटा गेल्या कुठे, इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी नोटा चलनात असताना आतापर्यंत कोणालाही समजले कसे नाही, असे प्रश्न उपस्थित होत असून, जबाबदार अधिकारी अजूनही मोकाट असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.